"इस इलाकेमें नए आए हो बरखुरदार, वर्ना शेरखानको कौन नहीं जानता" किंवा "दोस्तो दुनियामें दो तरहके जहर होते है मगर इन सबमें सबसे खतरनाक जहर है शराब" किंवा "शेर और बकरी जिस घाट पर एक साथ पानी पीते हैं वो घाट हमने देखाही नहीं!" असे कित्येक संवाद ज्या विशिष्ट,दमदार आवाजात आपण ऐकले आहेत तो होता आपल्या आवडत्या प्राणसाहेबांचा!
प्राण सिकंद यांचा जन्म १९२० साली दिल्लीभधे एका श्रीमंत पंजाबी कुटुंबात झाला. मॅट्रीक झाल्यानंतर एका स्टुडियो मधे फोटोग्राफर ची नोकरी करु लागले. साधारण २०/२१ वय असेल त्यांचं! त्या स्टुडियोच्या जवळ एक पानाची टपरी होती. एकदिवस पान घ्यायला आले असताना त्यांनी पाहीलं कि एक माणूस अगदी रोखून बघतोय. ते कथालेखक "वली महंमद" होते. प्रसिध्द "पांचोली आर्ट पिक्चर्स" च्या दलसुख पांचोलींना खलनायका च्या भूमिकेसाठी नव्या चेहेर्याची गरज होती. आणी त्यासाठी प्राणसाहेबांना विचारले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता "यमला जाट"!
त्याकाळी "लाहोर" ही चित्रपट निर्मिती साठी प्रसिध्द होते. *यमला जाट* मधे खलनायक साकारल्या नंतर*खानदान* चित्रपटात नायकाची भूमिका केली. सोबत नायिकेच्या भूमिकेत सुप्रसिध्द तारका नूरजहान होती. १९४६ साली म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या १वर्ष आधी त्यांनी कुटुंबासह मुंबई गाठली आणि ताजमहाल हॉटेल मधे राहू लागले. तेव्हा ताजच्या रुमचे भाडे होते रु. ५५. नंतर भाडे न परवडल्यामुळे गेस्टहाऊस मधे शिफ्ट झाले.
तो काळ राजकपूर, दिलिपकुमार आणि' देव आनंदचा होता. तगडी स्पर्धा होती. त्यात टिकून रहायचे तर काहीतरी वेगळेपणा हवाच! प्राणसाहेबांनी मनाशी एक नक्की ठरवलं कि व्हिलन टाईप कास्ट होऊ द्यायचा नाही. म्हणून त्यांनी *बडीबहेन* चित्रपटाचे निर्माते डी डी कश्यप यांना विचारून सिगरेटच्या धुराच्या वलयाची स्टाईल पुढे आणली पण ती त्याच चित्रपटा पुरती. त्यांनी कधीही एखादी स्टाईल, गेटअप वा तकिया कलाम रिपीट केला नाही.
त्याआधी १९४८ साली आलेला प्रसिध्द दिग्दर्शक "शाहीद लतीफ" यांच्या "जिद्दी"सोबत "देवआनंद", "कामिनी कौशल" होते. यासाठी प्रसिध्द अभिनेते शाम यांनी शिफारस केलेली. त्यानंतर *बरसात की रात*, *बडी बहेन*; *आह*, *चोरी चोरी*; दरम्पान *मुनिमजी* चित्रपटात प्राण साहेबांनी हेमंतदा आणि गीतादत्त बरोबर "दिलकी उमंगे हैं जवां" या गाण्यात आपला (बेसूरा) सूर मिळवलाय.गीता दत्त "गाईये" "बहुत अच्छे" असे म्हणत असते. ते फार गमतीशीर वाटतं.अमरदीप* हे चित्रपट आले. *आझाद*, *चोरी चोरी* ह्या नंतर एक असा चित्रपट आला कि खलनायकाचे नाव हे चित्रपटाचे शिर्षक होते,*हलाकू* "चंगेझखान" ह्या मगोलियन वंशाच्या क्रुरकर्म्याच्या नातवाचे "हलाकू"चे काम प्राणसाहेबांनी अप्रतीम केलय. ह्यातला त्यांचा गेटअप त्यांना स्वतःलाही खूप आवडायचा.
बेसिकली रोमॅंटिक फिल्म मधे नायिकेवर डोळा ठेवणारा आणि त्यासाठी नायकाला पाण्यात पहाणारा, प्रसंगी त्याच्या जीवावर उठणारा खलनायक त्यांनी बर्याच चित्रपटात रंगवला. जसा कि... मधुमती", "आझाद" या चित्रपटात, दिलिपकुमार,"आह", 'चोरी चोरी" मधे राजकपूर, "मुनिमजी" "जब प्यार किसिसे होता है" मधे देव आनंद,"कश्मिरकी कली", "ब्रह्मचारी" मधे शम्मीकपूर. जावेद अख्तर यांनी यासाठी एक मजेशीर नाव दिलय! रोमॅंटिक व्हिलन! आणि मग अशा व्हिलनच्या भूमिकेसाठी गूडलुकिंग चेहेर्यामुळे बहुतेक प्राणसाहेब च फिट बसायचे. प्राणसाहेबांनी अशा भूमिकात भरपूर मार खाल्लाय.
*मधुमती* मधील राजा उग्रनारायण, *छलिया* मधील अब्दुल रेहमान, याच बरोबर *जिस देशमें गंगा बहती है* मधील डाकूच्या भूमिकेतील *राका* ही भूमिका त्यांच्या अनेक उत्तम भूमिकांपैकी एक आहे. यात मधुबालाची बहीण चंचल आहे जी "राका" वर प्रेम करत असते पण त्याला "कम्मो"(पद्मिनी) बरोबर लग्न करायचे असते. यात प्राणसाहेबांचा डाकूचा गेटअप, केसांची स्टाईल पण खासच आहे. यातले "हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने"हे सुंदर गाणं राजकपूर, प्राण आणि इतर कबिल्याची लोकं यांच्यावर चित्रित आहे. यात गळ्यावरुन हात फिरवण्याची त्यांची लकब प्रसिध्द झाली होती.
*हाफ टिकट* या चित्रपटात किशोर कुमारला अवैध कामासाठी हस्तक म्हणून वापरणार्या "डायमंड स्मगलरची" त्यांनी भूमिका केली आहे. त्याला विनोदी झाक आहे. त्यात दोघांनी वेश बदलून "आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया" ह्या गाण्यात धमाल केली आहे.*कश्मीर की कली* या चित्रपटातला खलनायक वेगळ्या ढंगाचा आहे. क्रूर,खुनशी! नायिकेच्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात तिचीच लालसा धरणार्या "मोहनची" भूमिका होती. त्यात तो "श" च्या जागी "स" आणि "च" "स" ऐवजी "श" म्हणे! जेव्हा जेव्हा सिगरेटचा कश घेई तेव्हा म्हणे,"शताले शताले शंपा कभी तो अपना भी समय आएगा! हॅहॅहॅहा!"
साठच्या दशकातीलच मनोज कुमारच्या *शहीद* या चित्रपटात भयानक कैदी डाकू केहार।सिंगची भूमिका केली आहे.
भूमिका छोटीशी असली तरी अगदी छाप पाडून जाते. जेलमधे जेव्हा केहारसिंगला
भगतसिंगांविषयी समजते तेव्हा कुठेतरी ह्रदयाच्या एका कोपर्यात त्यांच्याविषयी आदर जागा होतो. फाशीच्या वेळी त्याला शेवटची इच्छा विचारतात तेव्हा
"जिंदगीमें मैंने बहोत बुरे काम किये है लेकिन आज किसी अच्छे आदमीसे हाथ मिलाना चाहता हूं" असे म्हणून भगतसिंगांना भेटायची इच्छा व्यक्त करतो. छोटासाच प्रसंग पण डोळे ओला
वतात. *गुमनाम* ह्या रहस्यपटातही
बॅरीस्टर राकेशची भूमिका लक्षात रहाण्यासारखी! त्यातलं त्यांचं हेलन बरोबरचं *इस दुनियामें जीना हो तो सुन
लो मेरी बात* हे गाणं पण धमाल होतं.
१९६० मधलेच अजून काही चित्रपट होते *दिल तेरा दिवाना*, *राजकुमार*, *लव इन टोकियो*, *पत्थरके सनम*, *राम और शाम*, *ब्रह्मचारी* आणि *उपकार*. मनोजकुमारचा मला आवडलेला चित्रपट
आणि प्राणसाहेबांचा "मलंगचाचा" तर केवळ अप्रतीम! उपकार संदर्भात काही आठवणी! ह्या चित्रपटाचे आउटडोअर शूटिंग चालू होते. एक दिवस सर्वांनाच जाणवले प्राणसाहेब गप्प गप्प आहेत आणि त्यांचे हातही कापतआहेत. शेवटी मनोज कुमारने विचारले असता कळले कि त्या दिशी त्यांची बहीण गेली होती. मनोजकुमारने विचारले," मला सांगितले कां नाहीत"? आपण शूटींग रद्द केलं असतं तेव्हा ते म्हणाले," बहीण तर गेली. आता शूटींग रद्द करुन तुमचे नुकसान कां करायचे? ह्याच चित्रपटासाठी त्याना Best supporting Actor चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
प्रकाश मेहरांनी *जंजीर* साठी प्राण साहेबांना शेरखान पठाणचा रोल ऑफर केला होता तेव्हाच मनोज कुमार
नी *शोर* साठी पठाणाच्याच रोल साठी
विचारले तेव्हा त्यांनी मनोजकुमारला
नम्रपणे नकार दिला. खरं तर त्यांचे आणि मनोजकुमारचे कित्येक वर्षांचे
असोसिएशन होते. पण केवळ प्रकाश मेहरांना पहिला शब्द दिला होता आणि
कुठलाही रोल रिपीट करायचे नाही हे
ठरलेले असल्यामुळे त्यांनी *जंजीर* मधेकाम करुन शेरखान अमर केला.
यातले *यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी* ही कव्वाली कधिही ऐकली कि
प्राणसाहेबच डोळ्यासमोर येतात!
आता प्राणसाहेब खलनायका बरोबरच
चरीत्र भूमिकाही करु लागले होते. जसे सत्तरच्या दशकात आलेल्या *गंवार* *तुम हंसी मैं जवां*( ह्यातला वाक्य संपतानाचा ओफफोफोफो हा तकिया कलाम खूप प्रसिध्द झाला होता), *पूरब और पश्चिम* मधे खलनायक तर *परीचय* *व्हिटोरीया नंबर २०३, अशा काहींमधे चरीत्र भूमिका पण छानच साकारल्या. गुलजारजींच्या *परिचय* मधले मुलाने मर्जीविरुध्द लग्न केल्यामुळे नाराज असलेले पण मुलगा सुनेच्या अकाली मृत्यूने व्यथित झालेले पण वरवर प्रथम राग दाखवणारे, पण अतिशय शिस्तप्रिय असलेल्या प्रेमळ दादाजींच्या भूमिकेचेही लोकांनी तेवढेच स्वागत केले. अमिताभच्या *मजबूर* मधेही शेवटी अमिताभला मदत करणार्या चोराचे, मायकेल डिसूझा चे काम आणि त्याचे गाणे *फिर ना कहना मायकल दारु पीके दंग करता है* खूपच गाजले.
*व्हिक्टोरि नं २०३ मधे अशोक कुमार
राजाच्या आणि प्राणसाहेब इरसाल राणाच्या भूमिकेत होते. त्यांचे *दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछकर हारे*
हे गाणे पण खूप गाजले. राजकपूरच्या *बॉबी* मधे रिषीकपूरच्या श्रीमंत वडि लांची भूमिकाही रुबाबात केली होती.
१९७४ मधेच अजून आलेला एक सुप्परहीट चित्रपट *धर्मा* त्यात सूरजसिंग धर्मा ची मध्यवर्ती भूमिका होती. त्यातली बिंदू बरोबरची *इशारोंको अगर समझो राज को राज रहने दो* ही हीट कव्वाली कोण विसरेल? तसेच !त्याचवर्षीच्या कसौटी ह्या चित्रपटात अमिताभचा मित्र "प्यारेलाल" ची भूमिका होती. त्यातले नेपाळी गेटअपमधले *हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है* हे गाणं पण खूपच मजेशीर! त्यातली दोन आंगठ्यांची हालचाल लक्षात रहाते.
मनोजकुमार बरोबरचा *दसनंबरी* आणि मेहेमूद बरोबरचा *लाखोमें एक* हे चित्रपट ही याच काळातले!
प्राणसाहेब काही मोजक्या वेळ पाळणार्या कलाकारांपैकी एक होते. *विश्वनाथ* चित्रपटासाठी शूटिंग चालू असताना एक दिवस सुभाष घई नेहमी उशीर करणार्या शत्रूघ्न सिन्हाला वैतागून म्हणाले तू आजपर्यंत कधीही वेळेवर येत नाहीस, आणि हे सदगृहस्थ दुपारी दोनची वेळ असली तरी ९.३० पासून सेटवर येऊन बसतात. काहीतरी शीक यांच्याकडून!
१९८० च्या दशकातले *कर्ज* *कालिया* *दोस्ताना*, *नसीब* *नास्तिक* *दोस्ताना* इत्यादी चित्रपटातही त्यांच्पा संस्मरणीय भूमिका होत्या. रोल छोटा असला तरी प्राणसाहेब आपला ठसा उमटवत असतं.
*,शराबी* चित्रपटातही अतिशय श्रीमंत पण कठोर उद्योगपतीची भूमिका आहे.
८०च्या दशकाच्या शेवटी शेवटी *पाप की दुनिया* *सौतन* *शहेनशहा* *राजतिलक* हे काही चित्रपट केले. १९६९ ते १९८२ पर्यंतचे मेन लीड सोडले तर इतर भूमिकांमधे ते हायेस्ट पेड स्टार होते. ९० च्या दशकात *सनम बेवफा* १९४२, अ लव्ह स्टोरी असे मोजके चित्रपट केले. अमिताभच्या विनंती वरुन त्याच्या होम प्रॉडक्शन
*तेरे मेरे सपने* आणि *मृत्यूदाता* या चित्रपटातभूमिका केल्या. मृत्यूदाताच्या वेळी तर त्यांचे पाय अक्षरशः कापत होते.खरं तर १९७८मधे ह्रदयविकाराचा झटका आला होता आणि तेव्हापासून
त्यांनी कामं करणे कमी केले होते.
मृत्यूदाता हा त्यांचा शेवटचा चित्रपट!
नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी
करणं थांबवलं.
अपघाताने चित्रपटसृष्टीत आलेल्या प्राणसाहेबांनी ३५० चित्रपटात काम केलं. त्यांच्या सुखी, समृध्द आयुष्यात
खूप सारे मानसन्मान पुरस्कार मिळवले.
१९६७,६९ ,७२ मध्ये फिल्मफेअरचे Best supporting Actor चे पुरस्कार मिळाले. नंतर १९९७ फिल्मफेअचे Life Time Achievement आणी २००१ साली भारत सरकारकडून "पद्मभूषण" आणि २०१० मध्ये CNN ने निवडलेल्या २५ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होता. २०१३ साली मानाचा
"दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
अतिशय परोपकारी अश्या ह्या प्राण साहेबांचा सामाजिक कार्यातला त्यांचा सहभागही उल्लेखनीय. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या हक्कासाठी ते लढत! हा थोर कलाकार १२ जुलै २०१३ मध्ये चित्रपटसृष्टीला पोरका करुन गेला.
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment