*चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दो,मस्तराम बनके जिंदगीके दिन गुजार दो" ! टॅक्सी ड्रायव्हर" चित्रपटातले हे धम्माल गाणं सर्वांना आठवतच असेल."पण त्यातल्या "मस्तराम बनके जिंदगीके दिन गुजारदो" ही ओळ एका वेगळ्या टोन आणि पिच मधे म्हटलेले किशोरदां बरोबरचे सह गायक म्हणजे "मोस्ट लव्हेबल पर्सन" ज्यांच्यावर आपण भरभरुन प्रेम केलं, ते आपले जॉनी वॉकर! सडपातळ बांधा, मिश्कील चेहेरा, किनरा आवाज! पण अभिनयाची उंची अशी गाठली की बस्स!
जॉनीभाईंचे मूळ नांव बद्रुद्दिन जमाल उद्दिन काझी. ते मूळचे इंदूरचे. त्यांचे वडील कपड्याच्या मिल मधे कामगार होते. एकूण पंधरा माणसांचे कुटुंब होते. काही कारणानी मिल बंद पडली आणि खूप हाल होऊ लागले. म्हणून ते सर्वजण मुंबईला आले. बिकट परिस्थिती मुळे जॉनीभाईना सहावीत शाळा सोडावी
लागली. उदरनिर्वाहासाठी ते कधी कधी भाजी,फळं, कधी आईस्क्रीम तर कधी स्टेशनरी विकून विकून पैसे मिळवत. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्या पाच भावंडांचा कुपोषणाने मृत्यू झाला. सरतेशेवटी जॉनी भाईना BEST मध्ये कंडक्टर ची नोकरी मिळाली. तसं तर पूर्वी कंडक्टरची नोकरी करुन फिल्म इंडस्ट्री येणारे अजून काही कलाकार आहेत सुनिल दत्त, हसरत जयपुरी, रजनीकांत!
जॉनी भाई चा स्वभाव खूप विनोदी होता. थोड्या वेळासाठी कां होईना ही नोकरी त्यांनी खूप एन्जॉय केली. गर्दी नसली की ते प्रवाशांशी गप्पा मारत. असेच एकदा बसमध्ये बलराज सहानी चढले.त्यांनी बरेच दिवस जॉनीभाईंचे निरीक्षण केले होते. त्यावेळी गुरुदत्तंची *बाझी* चित्रपटाची तयारी चालू होती त्यासाठी अट्टल दारुडा शोभेल असा माणूस ते शोधत होते.
बलराज साहनी स्वतः चित्रपटाचे लेखक होते. त्यांनी जॉनीभाई ना चित्रपटात काम करायला आवडेल का असे विचारले. जॉनी भाईंची इच्छा तर होतीच. ते लगेच तयार झाले. बलराज जीनी त्यांना गुरुदत्त यांना भेटायला सांगितले. गुरुदत्त यांनी त्यांना अट्टल दारुड्याचा अभिनय करायला सांगितले. तो त्यांनी इतका बेमालूम केला की गुरुदत्त बेहद्द खूष झाले. त्या दिवसा पासून गुरुदत्त यांच्या प्रत्येक चित्रपटात जॉनी भाई असायचेच. जानीवाकर हे नावही त्यांना गुरुदत्त यांनीच दिले. तेही एका प्रसिध्द Scotch Whisky च्या नावावरुन!
*बाझी* नंतर *जाल*, *सी आय डी* आणि *आर पार* मध्ये जॉनी भाईंच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. Navketan च्या *सी आय डी* मध्ये जॉनी भाईंची सह्रदयी असणार्या पाकीटमाराची, "मास्टरची" भूमिका आहे. त्यांच्या वर एक गाणे आहे *ऐ दिल है मुश्किल जीना यहा जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान*! हे लोकाना एवढे आवडलं की तो एक ट्रेन्ड सुरू झाला. गुरुदत्तंचा *आरपार* हा एक हलका फुलका विनोदी चित्रपट ! त्यात मित्र रुस्तम बनलेल्या जानीभाईंवर *अरे वा वा वा वा ऐसा कैसे होगा* हे मस्त गाणे चित्रित होते. या चित्रपटा मुळे त्या दोघांची मैत्री अतिशय दृढ झाली.
जॉनी भाईंना गुरुदत्त सीन सांगत आणि
बाकीचे जॉनी भाई वर सोडून देत. ते जे काही इंम्प्रोवाइजेशन करत त्यानुसार लेखक अब्रार अलवी सीन पुन्हा लिहीतं! खरचं असं कलाकार दिग्दर्शकाचं नातच विरळा! जॉनी भाईंनी *देवदास*, *शहजादा*, *मरीन ड्राइव्ह* *रेल्वे प्लॅटफॉर्म*, *अलबेली* या मधेही विनोदी भुमिका केल्या नंतर गुरुदत्त मधुबाला अभिनीत *मि. अँड मिसेस 55* मध्ये पण गुरुदंचा मित्र जॉनी ची भूमिका होती. त्यात *दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई! नजरे मिली क्या किसीसे के हालत बदल बदल गई* या गाण्यात गुरुदत्त बरोबर आणि त्यांचे स्वतःचे यास्मिन ह्या सुंदर अभिनेत्री बरोबरचे *जाने कहां मेरा जिगर गया जी* ही दोन मस्त गाणी त्यांना मिळाली.
राजकपूर नर्गिस च्या *चोरीचोरी* मध्ये त्यांची शायरची मजेदार भूमिका होती आणि त्यांच्या आणि हास्य अभिनेत्री इंदिरा बन्सल वर चित्रीत गाणे पण खूप गाजले. *ऑल लाइन क्लिअर, आगे बढो आगे बढो छोटीसी ये अलटन पलटन फौज है मेरे घरकी* त्यांचे होम प्रॉडक्शन चे दोन चित्रपट *जॉनी वॉकर* आणि *मिस्टर कार्टून* तसेच "एम. सादीक" यांचे *छू मंतर* आणि *खोटा पैसा* यात ते मुख्य भूमिकेत होते. या सगळ्यात सहनायिका होती "श्यामा" पण चित्रपटांना मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून त्यांनी सूज्ञपणे प्राडक्शन बंद केले. त्यांचे *गेटवे आफ इंडिया* *चंगेझखान* आणि *माया बाजार* हे चित्रपट ही ठीक चालले.
यानंतर आला पत्रकाराची महत्वाची भूमिका असलेला B R Chopra यांचा *नया दौर* पूर्वी तर हिरोच्या पॅरलल भूमिका जॉनी भाईंना असे. त्यांची चित्रपटातली एंट्री पण अगदी शानदार असायची. त्यांना फक्त दारुड्याच्याच नाही तर इतरही भूमिका मिळू लागल्या होत्या आणि त्यांनी त्या उत्तम रीतीने केल्या. *नया दौर* मधे *मैं बंबई का बाबू नाम मेरा अंजाना, इंग्लिश धूनमें गाऊ मैं हिंदुस्तानी गाना* हे प्रसिध्द गाणे त्यांच्यावर चित्रित होते. 1955 साली प्रसिध्द अभिनेत्री शकीला हिच्या बहिणीशी नूरजहानशी त्यांनी विवाह
केला. त्याना सहा अपत्ये झाली तीन मुलगे आणि तीन मुली.
त्यानंतरचे ६० च्या दशकातले बरेच चित्रपट खूप महत्वाची भूमिका असलेले होते. त्यात *प्यासा*, *मधुमती*, *अमरदीप*, *अजी बस शुक्रिया*, *12 O' Clock*, *पैगाम* *कागज के फूल, भाई बहन* *चौदहवी .का चांद* *ब्लॅककॅट .*एक फूल चार कांटे* आणि आणखी काही! *प्यासा* मध्ये त्यांनी तेलमालीश वाला "अब्दुल सत्तार" गुरुदत्तंचा जिवा भावाचा मित्र उभा केलाय. आपल्या कवी मित्राच्या मागे खंबीर पणे उभा राहणारा, त्याला मेंटल असायलम मधून सोडवणारा! ह्यातले *सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए* हे गाणं खूपचं गाजलं! अस म्हणतात कि एकदा दोघे कलकत्त्याला गेले असता गुरुदत्त त्यांना म्हणाले होते, "जॉनी इसे ठीकसे याद रखो शायद किसी दिन काम आ जाए"! आणि तसचं घडलं. "प्सासा"
मधला अब्दुल सत्तार साकार करताना त्याचा निश्चितचं उपयोग झाला.
गुरुदत्तं प्रमाणे बिमलदांचे पण जॉनी भाई
लाडके कलाकार होते. त्यांच्या *मधुमती* प्मध्ये आनंद म्हणजे दिलीप कुमारच्या दारुड्या मित्राची म्हणजे "चरणदासची" उत्तम भूमिका केल्याने उत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. *जंगहमें मोर नाचा किसिने ना देखा* या गाण्यात त्यांनी धमाल केली आहे. *अमरदीप* मध्ये मुक्री बरोबर, "अब डर है किसका प्यारे, गम भागे बेटा सारे तर *अजी बस शुक्रिया* मधे..*सच कहता है जॉनी वाकर, घरकी मुर्गी दाल बराबर* तर जी पी सिप्पींची मर्डर मिस्ट्री *12 O' Clock* मधे *देख इधर ऐ हसीना जून का है महिना डाल जुल्फोंका साया आ रहा है पसीना*
एस एस वासन आणि बी नागी रेड्डी या साऊथ च्या प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक जोडीच्या *पैगाम* मधे जानी भाईंना दोन मजेदार गाणी होती. एक मिनू मुमताज बरोबर *बदला है सारा जमाना बाबू* आणि *कैसे दिवाली मनाए हम लाला अपना तो बारा महिने दिवाला* ब्लॅक कॅट
मधे *वन टू थ्री फोर, दिलका तू चोर फाईव्ह सिक्स सेवन एट ओ यू आर ग्रेट* हे क्लब सांग आणि गुरुदत्तंचा *कागजके फूल* यातही त्यांना चांगल्या भूमिके बरोबर एक गाणही आहेच! *हम तुम जिसे कहता है शादी, यू नो है पूरा बरबादी*
*चौदहवी का चांद* हा ६०च्या दशकातच
आलेला अजून एक लेखक अबरार अलवी,गुरुदत्त या जोडीचा चित्रपट! त्यात पण त्यांची गुरुदत्तंचा मित्र "मिर्झा मसरद्दीक शाईझा" ची विनोदी भूमिका लोकांना आवडली. त्यात त्यांच्यावर दोन गाणीही चित्रित आहेत. *ये दुनिया गोल है उपरसे फोल है* आणि *मेरा यार बना है दुल्हा और फूल खिले है दिलके, अरे मेरी भी शादी करवा दो दुवा करो सब मिलके!
1964 साली गुरुदत्तंच्या अकाली मृत्यूने ते पूर्ण खचले होते. गुरुदत्तंची मैत्री अतूट होती. त्याचा परीणाम त्यांना काम मिळण्यावर पण झालेला. पण देवआनंद, बरोबरही त्यांचे चांगले असोसिएशन होते. तसेच बिमल राय, बी आर चोप्रा, एम सादीक आदी अनेक निर्मात्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्याने काम मिळत गेले.
जॉनी भाई ना लक्षात रहाण्याजोग्या भूमिके बरोबरच एकतरी गाणे असायचे
आणि ते पण बहुतेक रफीसाहेबांच्याच आवाजातले! ७०च्या दशकाच्या सुरुवातीला मेहेमूदचा *छोटे नबाब* हा आर डी बर्मन यांचा संगीतबध्द केलेला पहिला चित्रपट! यातही * जीनेवाले मुस्कुराके जी..या गाण्यात हेलन आणि मेहेमूद बरोबर जॉनी भाईंचे मस्त क्लब सांग आहे.*बात एक रातकी* मध्ये C I D म्हणजे (चरणदास ईश्वरदास ढोलकिया ) C I Dholakia ची भूमिका आहे. नेहमी प्रमाणे एका मस्त गाणं जॉनी भाईंना आहे. ते पण मन्नादांनी गायलेलं,*किसने चिलमनसे मारा नजारा मुझे......
१९६८ साली आलेला गुरुदत्तंचे भाऊ आत्माराम यांचा *शिकार* हा एक रहस्य
पट! त्यातल्या विनोदी भूमिकेसाठी जानी भाईंना Best Comedian म्हणून फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. १९७१सालचा ह्रषिदांच्या चित्रपटात छोटी पण अतिशय संस्मरणीय अशी "ईसाभाई मुसावाला" ची भूमिका त्यांना करायला मिळाली.
त्यात आनंदने (राजेश खन्ना) नाटकाचे ईसाभाईंनी लिहीलेले संवाद टेप केलेले असतात आणि तीच टेप शेवट जेव्हा आनंद प्राण सोडतो तेव्हा वाजते तेव्हा मनाची काय अवस्था होते हे शब्दात सांगणे अवघड! आनंदच्या निधनाची बातमी कळताच ईसाभाई दुःखाने "इतनी जल्दी पर्दा नहीं गिरने दूंगा" असे म्हणत तिथून जातात तेव्हा थिएटर मधला प्रत्येक माणूस रडत असतो. खरचं जॉनी भाई तुम्ही ग्रेट होतात. खळखळून हसवायची आणि तेवढ्याच intensity ने रडवायची ताकद तुमच्या अभिनयात होती.
त्यांचे *फूल बने अंगारे* *मेरे मेहेबूब *दिल दिया दर्द लिया* *बहारे फिर भी आएगी* *बहु बेगम* *दुल्हन एक रातकी *दूर की आवाज* ह्यातलं (हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू खूप प्रसिध्द आहे) *नाईट इन लंडन* *हसीना मान जाएगी*,* दुश्मन**आदमी और इन्सान* हे चित्रपट पण साठ ते सत्तरच्या दशका मधले!
*प्रतिज्ञा*, राजा जानी *जखमी* शान*
मजदूर *बंडलबाज हे त्यांचे शेवट शेवटचे चित्रपट! त्यानंतर विनोदाचा खालावलेला दर्जा त्यांच्या पचनी पडला नाही. निर्भेळ विनोदाची सद्दी संपत आल्याने त्यांनी स्वतःच काम थांबवले. त्यानंतर १७/१८ वर्षांनी गुलजारजींच्या मदतीने कमल हसन याने त्याची *चाची ४२०* या चित्रपटात काम करण्या
साठी भेट घेतली आणि निखळ विनोदाची
ग्वाही दिली.तीच त्यांची शेवटची भूमिका
जॉनी भाईंनी सुमारे ३०० चित्रपटात काम केले. त्यांनी आपल्या सहजसुंदर, नैसर्गिक विनोदाने आयुष्यभर लोकांना हसविले. त्यांनी हसविण्यासाठी ना कधी
द्वर्य्थी संवादाचा सहारा घेतला, ना अचकट विचकट बोलणे वा अंगविक्षेप केले. त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात दारुड्याच्या भूमिका केल्या पण दारुच्या थेंबालाही शिवले नाहीत.
स्वतःला परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले म्हणून साही मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, पहिल्यांदा उदर निर्वाहासाठी, नंतर आयुष्यात काही बनण्यासाठी आणि शेवटी कमावलेले स्टेटस राखण्यासाठी!
पण नेहमी मस्तीत जगले. ते नेहमी म्हणत कि एका तत्वाला धरुन वागलो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले. म्हणून आयुष्यात मी सुखी आहे. त्याच्या आवडत्या शेरने या लेखाचा शेवट...
* जमीर कांप तो जाता है
आप कुछ भी कहे
वो हो गुनाहोंके पहले
या गुनाहोंके बाद*
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment