Skip to main content

Lyrisist...शैलेंद्र***

मागल्या काही दिवसात आवडत्या संगितकारांवर लिहीले. काही वेगळा विचार करताना सहज मनात आले आवडत्या गीतकारावर लिहावे कां? आणि पहिले नाव समोर आले *शैलेंद्र*! साध्या सोप्या शब्दात जीवनाचं सार सांगून गेलेले...राजकपूर चे लाडके कवीराज.... शैलेंद्रजींचे खरे नाव शंकर केसरीमल! त्यांचा जन्म रावळपिंडीचा. तसे मूळचे हे कुटुंब बिहारचे. पण वडिल पोटापाण्या साठी दिल्लीत आलेले. कालांतराने शैलेंद्रजी मुंबईत आले आणि रेल्वेच्या माटुंगा यार्डात वेल्डर म्हणून कामाला लागले. शालेय दिवसांपासूनच त्यांना काव्यात रुची होती. नोकरी चालू अस तानाही त्यांचे कवीमन स्वस्थ बसले नव्हते. ते वेगवेगळ्या मुशायर्र्यांना हजर रहायचे. एकदा असच एका मुशायर्र्यात राज जी हजर होते आणि शेलेंद्रजींची "जलता पंजाब" ही कविता त्यांना खूप आवडली. त्यावेळेस ते *बरसात* बनवत होते. त्यांनी शैलेंद्रजींना चित्रपटासाठी गीतलेखन करणार कां असं विचारलं! शैलेंद्रजींनी बाणेदारपणे पैशासाठी कविता विकणार नाही असे ऊत्तर दिले. पण नंतर त्यांचीपरिस्थितीच पालटली. शैलेंद्रजींना बायकोच्या बाळंतपणासाठी पैशाची निकड होती तेव्हा ते सरळ राजजींच्या आॅफीसमधे गेले आणी ५०० रुपये उसने मागितले. राजजींनी पण लगेच त्यांना पैसे दिले. शैलेंद्रजी ३ महिन्यांनी पैसे परत करायला गेले असता राजजींनी पैसे परत घेतले नाहीत पण चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास सांगितले. बरसातची २ गाणी लिहायची होती बाकीची हसरतजींनी लिहिली होती.शैलेंद्रजींनी लिहिलेली ती गाणी होती. *बरसातमें हमसे मिले तुम सजन* आणि *"पतली कमर है तिरछी नजर है*".... "आवारा" चित्रपटाची तयारी सुरु होती. राजजी शैलेंद्रजींना घेऊन पटकथा लेखक के ऐ अब्बास यांच्याकडे घेऊन गेले. राजजींनी ओळख करुन दिली. ह्या साध्या दिसणार्र्या माणसाकडे अब्बास साहेबांनी फारसे लक्ष दिले नाही. स्टोरी सेशन झाल्यावर राज साहेबांनी शैलेंद्र जीना विचारले कवीराज कैसी लगी? शैलेंद्रजी म्हणाले अच्छी लगी! राजजींनी पुन्हा विचारले कुछ समझमें आया? शैलेंद्रजी पटकन म्हणाले," बिचारा गर्दिशमें था, आसमानका तारा था..आवारा था! अब्बास साहेब अवाक झाले. ते म्हणाले माझ्या दोन अडीच तासाच्या गोष्टीच सार ह्या माणसाने एका ओळीत सांगितलं! कोण आहे कोण हा? राजजींनी पुन्हा ओळख करुन दिली. "आवारा हूं" हेच शेवटी चित्रपटाचे शिर्षक गीत झाले. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक शिर्षकगीतं शैलेंद्रजींचींच आहेत. त्यापैकी काही... *बरसात* में हमसे मिले *आवारा* हूं *चाहे कोई मुझे *जंगली* कहे *आहा *आई मिलनकी बेला* देखो आई बोल राधा बोल *संगम* होगा के नहीं *सच है दुनियावालो के हम है *अनाडी* *जिस देशमें गंगा बहती है* *राजकुमार* तेरे बिन रहा न जाए *दिल अपना प्रीत पराई* काही गाणी शैलेंद्रजींना कशी सुचली याचेही किस्से आहेत. एकदा सर्वजण् म्हणजे शंकर ', जयकिशन, सहाय्यक दत्ताराम, शैलेंद्रजी चेंबूरला चालले होते. रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकामं चालली होती आणि दत्तारामजी सारखे मागे वळून पहात होते. शंकरजींनी विचारले मुडमुडके क्या देख रहा है शैलैंद्र बाजूलाच बसलेले. ते म्हणाले अरे इसपर तो गाना बन सकता है..आणि शैलेंद्रजींनी लिहिले..*मुडमुडके ना देख मुडमुडके* *कालाबाजार*ची गाणी बसवतं असताना एक दिवस सचिनदांनी शैलेंद्रजींना म्हटले आज कुठल्याही परिस्थितीत गाणे पाहिजे आणि पंचम ना शैलेंद्रजींबरोबर पाठवून म्हणाले गाणं घेतल्याशिवाय याला सोडू नकोस. दिवसभर सगळीकडे भटकूनही गाणं झालं नाही. शेवटी दोघे जुहूला गेले आणि समुद्र किनार्र्यावर नीरव शांततेत वरती चंद्राकडे पहात नी सिगरेटच्या पाकिटाच्या कागदावर लिहिले..*खोया खोया चांद खुला आसमान*... १९५० ते १९६० चे दशक आणि पुढची ३/४ वर्षे शैलेंद्र जींनी उत्तमोत्तम सुमारे ८०० गाणी दिली. त्यावेळचे ते Highest paid गीतकार होते. अर्थात सर्वात जास्त काम त्यांनी "शंकर जयकिशन" बरोबर केलय. त्यांची काही गाणी बाजूला काढणे हे समुद्रात सुई शोधण्या इतके अवघड! तरीही हा छोटासा प्रयत्न! शंकर जयकिशन.. *आ जाओ तडपते हैं अरमां *घर आया मेरा परदेस *मुडमुडके ना देख मुडमुडके *रमैया वस्तावैया मैंने दिल तुझको दिया *हर दिल जो प्यार करेगा *दिलका हाल सुने दिलवाला *प्यार हुआ इकरार हुआ *ये रात भीगी भीगी *आजा सनम मधुर चांदनीमें हम *किसीकी मुस्कुराहटोंपे हो निसार *वो चांद खिला वो तारे हंसे *तेरे बिन सूने नैन हमारे *बेगानी शादीमें अब्दुल्ला दीवाना *आ अब लौट चले *ओ शमा मूझे फूंक दे *मैं आशिक हूं बहारोंका, नजारोंका... *दोस्त दोस्त ना रहा *हर दिल जो प्यार करेगा *तुम ही तुम हो मेरे जीवनमें *रातके हमसफर थकके घरको चले *सचिनदा* *काटोंसे खींचके ये आंचल *तेरे मेरे सपने अब एक रंग है *गाता रहे मेरा दिल *रुलाके गया सपना मेरा *क्या से क्या हो गया *मेरे साजन है उसपार *मोरा गोरा अंग लैले *जोगी जबसे तू आया *अपनी तो हर आह एक तूफान है *,सलीलदा* *सुहाना सफर और ये मौसम हंसी *दैयारे दैयारे चढ गयो रे पापी *घडी घडी मोरा दिल धडके *ओ सजना बरखा बहार आई *मिला है किसीका झूमका *आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे *अपनी कहानी छोड जा *आजारी आ निंदिया तू आ *छोटिसी ये दुनिया पहचाने रासते हैं *एस एन त्रिपाठी* *१झूमती चली हवा याद आ गया कोई *रवीजी* *ये राते ये मौसम नदीका किनारा *पंचम* *घर जा घिर आई बदरा सावरिया *जीनेवाले मुस्कुराके जी *आज हुआ मेरा दिल मतवाला सर्वोत्कृष्ट गीतासाठी Film fare prize मिळालेली गीते... *आ लौटके आजा मेरे मीत *सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी *मैं गाऊ तुम सो जाओ* एक दिवस फणीश्वरनाथ रेणू यांची "मारे गए गुलफाम" ही कादंबरी शैलेंद्रजींनी वाचली. त्यांना कथा खूप आवडली आणि शैलेंद्रजींनी त्यावर चित्रपट काढायचं ठरवलं. सगळ्या जवळच्या मित्रांनी शक्य त्या मदतीची हमी दिली. पण या ना त्या कारणाने चित्रपट लांबत गेला. वर्षभरात बनणारा चित्रपट पाच वर्ष लांबला. बजेट तिपटी चौपटीने वाढले. सगळेच ढोकताळे चुकले. शैलेंद्रजींना निराशेने ग्रासले. तब्येत ढासळली. कसाबसा चित्रपट पूर्ण झाला पण चित्रपटाच्या प्रिमीअरला पण ते जाऊ शकले नाहीत. उत्तम कथा, उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन, उत्तम एकापेक्षा एक गाणी... *सजनवा बैरी हो गए हमार*, *दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमें समाई*, *सजन रे झूठ मत बोलो*, *चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजडेवाली मुनिया* *आ आभीजा रात ढलने लगी* *पान खाए सैंया हमारो* पण ह्यातलं काही कामी आले नाही. चित्रपट चाललाच नाही. आणि अत्यंत निराश होऊ हळुवार, कोमल मनाच्या ह्या कवीराजाने १४ डिसेंबर ला ह्या निर्दयी दुनियेचा निरोप घेतला. हा तोच दिवस राजजींचा वाढदिवस.शैलेंद्रजींच्या मुलीने एका मुलाखतीत म्हटले आहे लोक समजतात माझे बाबा चित्रपटा साठी झालेल्या कर्जापायी गेले पण ते सत्य नाही.,हा चित्रपट बनवताना त्यांच्या जवळच्या मित्रांचे, आप्तेष्टांचे जे वाईट अनुभव आले त्यांनी बाबा खचले आणि त्यातच वैफल्यग्रस्त होऊन त्यांचा अंत झाला.. असो..दैवदुर्विलास बघा, शैलेंद्रजी गेल्याग१वर या चित्रपटाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आणि हा चित्रपट तूफान चालला. खरं काय, खोटं काय हे शैलेंद्रजींबरोबर गेलं. आपण फक्त आठवायचं ते त्यांचे सुंदर , अजरामर काव्य! शैलेंद्रजींना त्यांच्याच शब्दात भावपूर्ण आदरांजली! *ओ जानेवाले हो सके तो लौटके आना ये घाट तू ये बाट कहीं भूल न जाना* कृपा देश'पांडे...

Comments