Skip to main content

Helan***

दुसर्या जागतिक महायुध्दाचा काळ. *ब्रह्मदेश* म्हणजे आता म्यानमार देशातली रंगून शहरातली छोटीशी ३/४ वर्षांची मुलगी. वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी! जपानने हल्ला केल्याने बहुतांश लोक जीव वाचवण्यासाठी देश सोडून जात होते. वडील मृत्यू पावल्या मुळे आई मुलांना घेऊन भारतात यायला निघाली. वेळप्रसंगी जंगलातून चालत चालत,जीव वाचविण्यासाठी. आसामला पोचेपर्यंत सहा ते सात महिने लागले. तिथे प्रथम hospital मधे admit व्हावे लागले कारण इतके दिवस नीट अन्नपाणी आणि सकस आहार न मिळा ल्याने त्यांना "बेरीबेरी" रोग झालेला. त्यानंतर कलकत्ता, देवळाली करत मुंबई गाठली. हे हाल सहन न होउन लहान भाऊ कलकत्त्यात दगावला. ही करुण कहाणी आहे नृत्य सम्राज्ञी हेलन ची! हेलनचा जन्म १९३८ चा! १९४७ मध्ये ती आणि तिची आई मुंबईत आले. हेलनच्या आईची इच्छा होती कि तिने चित्रपटसृष्टीत यावं! तिच्या आईची जुन्या काळची प्रसिध्द नर्तकी कूक्कू हिच्याशी ओळख होती आणि कधीमधी कूक्कूबरोबर स्टुडियोत चक्कर होत असे. हेलनच्या आईचीच इच्छा होती कि तीने चित्रपट सृष्टीत यावे. सुप्रसिध्द नृत्य दिग्दर्शक पी एल राज यांच्याकडे कथ्थक, मणिपुरी आणि भरतनाट्यमचे बेसिक शिक्षण घेतले होते. पुढे त्यांच्या बरोबरच तिने बरेच चित्रपटही केले. हेलनच्या करीयरची सुरुवात कोरस डान्सर पासून झाली. "शबिस्तान", "हुरे अरब" "आवारा" अशा काही चित्रपटात मध्ये कोरस परफॉर्मन्स दिल्या नंतर *हलाकू* चित्रपटात *अजी चले आओ तुम्हे आंखोसे दिलमें समाया* तसेच *यहुदी* मधे *बेचैन दिल खोईसी नजर* हा कुक्कू बरोबर डान्स करायला मिळाला.एक कोरस डान्सर ड्युएट परफॉर्मन्सेस सुध्दा करु लागली. १९५२ मधे आलेल्या *अलीफ लैला* या चित्रपटात *राते प्यारकी बीत जाएगी ये बहारे फिर ना आएगी* या गाण्यावर सुंदर सोलो परफॉर्मन्स करायला मिळाला. तसेच देव नूतनच्या *बारीश* चित्रपटात *मिस्टर जॉन बाबा खान* हे धमाल क्लब song तसेच *अनाडी* मध्ये राजकपूर बरोबर *नाईटीन फिफ्टी सिक्स नाईंटीन फीफ्टी सेवन* हा डान्स परफॉर्मन्स तसेच शक्ती सामंतांच्या *हावडा ब्रीज* मधील "मेरा नाम चिन चिन चू" हे blockbuster गाणे मिळाले. . त्यानंतर पहिल्यांदा एक असा चित्रपट मिळाला कि ज्यात डान्स बरोबर अभिनयाला पण वाव होता तो फिल्मा लयचा *हम हिंदुस्तानी* पण दुर्देव असे कि यात चांगले काम करुनही काही अपवाद सोडता फारशा चरित्र भूमिका तिच्या वाट्याला आल्याच नाहीत. आणि डान्सर म्हणूनच ती टाईपकास्ट झाली. १९६१ मधे आलेल्या गंगा जमना मधे *तोरा मन बडा पापी सावरिया रे* हे मुजरा नृत्य पण सुरेख सादर केलय. तसचं मेहमूदच्या छोटे नवाब मधे मेहमूद आणि जाॅनीवाॅकर बरोबर *जीनेवाले मुस्कुराके जी* हे क्लबसाॅंग पण मस्तचं आहे. शोर साहू यांच्या *दिल अपना प्रीत पराई* मधे राजकुमार बरोबर एक क्लब सांग *उईss इतनी बडी महफिल और एक दिल किसको दूं* तर शक्ती सामंतां च्याच *चायना टाऊन* मधे *यम्मा यम्मा यम्मा तू परवाना मैं शम्मा* हे गाणे आणि *शिकारी* मधे तर रागिणी ह्या नायिके बरोबरचे *तुमको पिया दिल दिया* हे नृत्य तर बहारदार! राज खोसलांच्या *वह कौन थी* मध्ये ती मनोजकुमार बरोबर *शोख नजरकी बिजलिया दिलपे मेरे गिराए जा* या गाण्यावर थिरकली, तर गुमनाम मधे सेक्रेटरीच्या रोल बरोबर तीन सुंदर गाणी परफॉर्म करायला मिळाली. त्यातलं एक मेहेमूद बरोबर ड्रीनसिक्वेन्स *हम काले है तो क्या हुवा दिलवाले हैं* नंतर एक प्राण यांच्या बरोबर *इस दुनियामें जीना हो तो सुनलो मेरी बात* ह्या गाण्याच्या अतिशय सोप्या स्टेपस आणि असूनही हे गाणं खूपच आकर्षक झालय आणि तिसरा नंदा बरोबर *पीके हम तुम जो चले आए* हा एक डान्स आहे. त्यानंतर नासिर हुसेन यांचा *तिसरी मंजिल* ह्यात शम्मीकपूर बरोबर क्लब मधे को डान्सर होती. त्या छोट्याशा भूमिके बरोबर *ओ हसीना जुफोंवाली जाने जहां* हा त्यांच्याबरोबर सुपरहीट डान्स आहे. त्यानंतर *ज्वेलथिफ*मधे अंजू महेंद्रू च्या साथीने *बैठे हैं क्या उसके पास* हा कॅबरे परफॉर्मन्स आहे. त्याच वेळी आलेल्या *ये रात फिर ना आएगी* या मधे पण *हुजुरेवाला जो हो इजाजत* हे मधुमती या डान्सर बरोबरचं नृत्य आहे. एक मात्र खरं कि हेलनच्या वाट्याला उत्तमोत्तम नृत्य आली पण मोजक्याच चांगल्या भूमिका आल्या. इतर वेळेस व्हिलन ची सेक्रेटरी, गॅंग मधील सदस्य किंवा व्हॅंप अशाच किरकोळ भूमिका तिच्या वाट्याला आल्या. हेलनचे नृत्य कौशल्य वादातीत आहे. वर सांगितल्या प्रमाणे मणिपुरी, कथ्थक, भरतनाट्यम च्या बेसिक स्टेप्स तीने डान्समास्टर पी एल राज यांच्पाकडून शिकल्या होत्या. कॅबरे च्या स्टेप्स तिने वेस्टर्न फिल्मस पाहून शिकल्या. तिच्या accessories म्हणजे पिसे, कलर लेन्सेस, विग्ज वगैरे ती फ्रान्स, इंग्लंडहून आणत असे. तिचा कॅबरेचा प्रत्येक आऊटफिट हा स्कीनकलर्ड बाॅडीसूट वर घातलेला आहे.हेलनने असंख्य सेन्शूअस कॅबरे केले पण व्हल्गॅरीटी ना तिच्या आऊट फिटमधे दिसली ना हावभावात!प्रत्येक गोष्ट तिने ग्रेसफूली कॅरी केली. हेलनने ओ पी रल्हन यांच्या *तलाश* मधे *करले प्यार करनेके दिन है यही* हा सेन्सेशनल "कॅबरे" केला. ह्यात मधे मधे एक एक ओळीचे संवाद आहेत ते आशाजींनी त्यांच्या खास आवाजात म्हटलेत! *वैजयंतीमाला* हे हेलनचे दैवत! तिच्यासारखी डान्सर कोणी नव्हती, नाही, आणि होणारही नाही हे तिचे ठाम मत आहे. तिच्या बरोबर एक सुंदर नृत्य करायची संधी तिला *प्रिन्स* या चित्रपटात मिळाली. *मुकाबला हमसे ना करो* ह्या गाण्यावर हेलेनने वेस्टर्न आणि वैजयंतीमालाने क्लासिकल नृत्य शम्मी कपूरच्या साथीने अप्रतिमपणे सादर केलयं! *इंतकाम* ह्या आर के नय्यर यांच्या चित्रपटात तिचे *आsssssss जानेजां* हे one of the best caberate songs! . हेलन वरोबर हे नृत्य प्रसिध्द डान्सर कोरिओग्राफर जोडी विजय ऑस्कर पैकी ऑस्कर आहे. साधारण पणे कॅबरे असेल तर आशाजींचा प्लेबॅक असे पण हे गाण लक्ष्मी प्यारेंना लताजींच्या आवाजात हवं होतं आणि लताजी तर अजिबात तयार नव्हत्या. लक्ष्मी प्यारेंनी खूप समजावून त्यांच्याकडून हे गाऊन घेतलय आणि त्यांचे प्रयत्न किती सफल झालेत ते आपल्या समोर आहेच. हेलनची *पगला कहीं का* ह्या चित्रपटात शम्मी कपूर बरोबर बर्यापैकी dramatic आणि मोठी भूमिका होती. तसेच राजेश खन्ना, तनुजा बरोबर *मेरे जीवन साथी* मधे प्रिन्सेस कामिनीची भूमिका पण लक्षात रहाण्या जोगी! राजेश खन्ना बरोबर *आओना गले लगालो ना* पण सेन्शुअस डान्स होता. १९८० आलेल्याच *द ट्रेन मधेही *मेरी जां मैंने कहा* आणि *मैंने दिल अभी दिया नहीं मैं अभी क्या जानू* हे दोन कॅबरे आहेत. *कारवा* हा चित्रपट full of dance, romance and Drama.त्यातही हेलनची प्रेम चोप्रावर मनापासून प्रेम असणार्या मोनिकाची भूमिका होती जी नंतर आशापारेखला संकटात मदत करते. त्यातला अतिशय फेमस डान्स पर फॉर्मन्स *पिया तू अब तो आजा* एकदम हीट झाला. त्याच सुमारास आलेला ओ पी रल्हन यांचा *हलचल* हा एकमेव सस्पेंस थ्रीलर असावा कि ज्यात हेलन असूनही एकही गाणे किंवा डान्स नाही. १९७२ सालच्या *मदहोश* मधील राकेश रोशन बरोबर *शराबी आखे गुलाबी चेहेरा देखा नहीं मगर दिल मेरा* हे गाणं काय किंवा *अनामिका* भधले *आज की रात कोई आनेको है रे बाबा* तसेच *शोले* मधल्या *मेहबूबा मेहबूबा* हे सर्वच डान्सेस अगदी सुप्पर हीट! *इन्कार * चित्रपटात *तू मुंगळा मैं गुडकी डली* हे क्लबसांग पण खूप गाजले. अमिताभच्या डॉन ह्या चित्रपटातले *ये मेरा दिल प्यारका दीवाना* हे आकर्षक नृत्यगीत तसेच हेलनचे काम पण लक्षात रहाण्या जोगे! त्याच वर्षी आलेल्या अमिताभ रेखाच्या *ईमान धरम* मधेही हेलनची चांगली भूमिका आहे. यानंतर फार दिवसांनी *लहू के दो रंग* या चित्रपटात मोठी भूमिका मिळाली. नॉन ग्लॅमरस रोल असूनही हेलनने सुंदर काम करुन फिल्मफेअरचे Best supporting actress award मिळाले. त्यानंतर *शान* *द ग्रेट गॅंबलर* *राम बलराम* सारखे थोडे चित्रपट करुन हेलनने चित्रपटात काम करायचे जवळ जवळ थांबवलेच. यानंतर जवळ जवळ सात आठ वर्षांनी संजय लीला भन्साळी यांच्या *खामोशी द म्युझिकल* मधे हेललने पुन्हा चित्रपटात पदार्पण केलं. अभिनया बरोबरचं तिच्या नृत्य कौशल्याची झलकही *गाते थे पहले अकेले आज गाता है सारा जहां* या गाण्यात पहायला मिळाली. त्यानंतर भन्साळींच्याच *हम दिल दे चुके सनम* मधे सलमान खानच्या आईची भूमिका आणि नंतर २०००साली यश चोप्रांच्या *मोहब्चते* मधे शहारुख खान बरोबर तिच्याच पूर्वीच्या गाण्यावर एक छोटासा डान्स परफॉर्मन्स केला. शेवटचे हेलनचे चित्रपट आहेत मेरीगोल्ड, शरारत, अन्जाने आणि करीना स्टारर हिरोईन! अगदी सुरुवाती पासूनच प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक पी एन अरोरा तिचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत. पण त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक आणि भावनिक फसवणुकीमुळे हेलन खूप दुःखी होती. सर्वबाजूने अडचणीत आलेल्या हेलनला अशावेळी मदतीची गरज होती.त्यावेळचे सुप्रसिध्द "स्क्रीन प्ले रायटर" सलीम खान यांनी हेलनला कामं मिळवून देण्यात मदत केली. सहानुभूतीचे रुपांतर प्रेमात झाले . १९८१ मधे सलीमखान आणि हेलन यांनी लग्न केले. सलीम खान यांचे हे दुसरे लग्न असल्याने सुरुवातीला फॅमिलीचा विरोध होता. पण हेलनने आपल्या प्रेमळ वागणुकीने सर्वांना आपललंसं केलं. या इंडस्ट्रीतल्या साधना, नंदा, वहिदा, आशापारेख आणि शम्मी ह्या जवळच्या मैत्रिणी! सगळ्या मिळून खूप मजा करायच्पा! आउटिंग, हॉटेलिंग कधी सिनेमा! आपला मराठी नटरंग ह्यांनी एकत्र बघितल्याचा फोटो पाहिलेला आठवतोय. आता त्यातल्या नंदा, साधना, शम्मीजी हयात नाहीत. हेलन या वयातही फिट्ट आहे. योग, व्यायाम, आणि आहारावर ताबा त्यामुळे तब्येत उत्तम! खान कुटुंबात चांगल्याप्रकारे रमली आहे आणि उर्वरीत आयुष्य सुखा समाधानाने घालवत आहे. ©कृपा देशपांडे...

Comments