Skip to main content

नूतन

"सीमा" "सुजाता" आणि "बंदिनी" ह्या तीन चित्रपटांच्या नावातच जिच्या अभिनयशक्तीची पुरेपूर कल्पना येते अशा नूतनवर लिहायचं धाडस करतेय आज! नूतनने जवळ जवळ ऐंशी चित्रपटात काम केले पण मी तिच्या अगदी महत्वाच्या चित्रपटांवर मी फोकस करणार आहे. नूतन च्या आई शोभना समर्थ ह्या त्यावेळच्या प्रसिध्द अभिनेत्री आणि वडील कुमारसेन समर्थ उच्च विद्याविभूषीत! त्यांना चार अपत्य, त्यापेकी नूतन थोरली..आई गोरीपान, सुंदर पण मुलगी सावळी! दिसायला पण साधारण! लहान वयातच ही तुलना तिच्या कानावर पडलेली...पण कृष्णही सावळाच होता पण लोक त्याला भक्तीभावाने पुजतातच ना, असे मनाला समजावत तिनं आपल्यां वागण्या बोलण्यात कुठेही ही खंत जाणवू दिली नाही. एक दिवस स्वतः अशा जागी पोहोचली कि ज्याचं नावं ते!

नूतन अडीच तीन वर्षांची असल्यापासून चौदा ते पंधरा वर्ष, पं जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे शास्रीय संगीत शिकत होती. आठ वर्षाची असताना तिने पहिल्यांदा "नल दमयंती" ह्या चित्रपटात काम केलं. तिला स्वतःला काही कळण्याचं वयही नव्हतं पण शोभनाजींच्या हे लक्षात आलं की मुलीला अभिनयाची समज आहे आणि तीला ते आवडतय. आणि
म्हणून त्यांनी स्वतःच एका चित्रपटाची निर्मिती केली ज्याचं नाव होतं "हमारी बेटी"...चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर "नगीना", "हमराज" आणि "लैलामजनू" हे चित्रपट आले. नगीनाच्या वेळी तर ती जेमतेम १५ वर्षांची होती. अस सांगतात कि तिच्याच चित्रपटाच्या प्रिमिअरला तिचं वय कमी म्हणून तिला आत सोडलं नव्हतं!

ह्यानंतर नूतनला शोभनाजींनी एक वर्षाकरता उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंड ला पाठवलं!  तिथून नूतनने जे फोटो पाठवले त्यात तिच्या व्याक्तिमत्वात कमालीचा बदल घडलेला शोभनाजींना जाणवला. तिथून परत आल्यावर नूतनने पहिला चित्रपट केला तो अमिया चक्रवर्तींचा *सीमा* एका अनाथ मुलीवर विनाकारण चोरीचा आळ येउन तिला सुधारगृहात पाठवले जाते. त्यामुळे ती बंड करुन उठते..तिची त्यावेळची चीड, राग, संताप, असहायता नूतनने अशी काही दाखवली आहे कि बस्स! ह्याचे संगीत होते शंकर जयकिशन ह्यांचे होते.
ह्यात रागदारीवर आधारीत एक गाणे आहे...*मनमोहना बडे झूठे* लताजी नेहमी सांगतात, मी इतक्या अभिनेत्रीं साठी पार्श्वगायन केले पण नूतन सारखे ह्या गाण्याचे अचूक लिप्सिंग (हरकती, मुरक्यांसकट) कोणीच नाही केले. ह्या चित्रपटासाठी नूतनला उत्कृष्ट अभिनेत्रीचा "फिल्मफेअर" पुरस्कार मिळालला.

ह्यानंतर अगदी वेगळ्या खेळकर मूडचा चित्रपट आला...*पेईंगगेस्ट*.साथीला एव्हरग्रीन देवआनंद! सचिनदांचे बहारदार संगीत! *दिल्ली का ठग* ही असाच हलकाफुलका धमाल चित्रपट..नायक किशोरकुमार.तर *सौनेकी चिडिया* (तलत मेहमूद ) हा अभिनेत्रीच्या जीवनावर आधारीत चित्रपट! याशिवाय ही *आखरी दाव* (शेखर), *अनाडी*, *छलिया* *दिल ही तो है! (राजकपूर) हे चित्रपट आणि त्यांची गाणी प्रचंड गाजली...

*सुजाता* हा बिमलदांचा आणखी एक नितांत सुंदर चित्रपट! नूतन ही भूमिका अक्षरशः जगली आहे. एक ब्राह्मणेतर मुलगी, ब्राह्मण कुटुंबात मोठी होते पण त्या घरातल्या आई, आजीच्या नजरेत, वागण्यात ती अस्पृष्य असल्याची भावना दिसायची..त्यांची हिच्याच वयाची मुलगी (शशीकला) आणि वडीलही खूप  प्रेमाने वागायचे. त्पांच्याकडे येणार्र्या ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाला(सुनिल दत्त) हिची कुचंबणा समजते. त्याचे तिच्यावर प्रेम जडते. ही हळूवार प्रेमकथा बिमलदा यांनी अतिशय संवेदनशीलतेने मांडली आहे आणि त्याबरोबरच समाज्यातल्या ह्या कुप्रथांवर न बोलता ताशेरे ओढलेत.ह्याचे संगीत सचिनदांचे! गाणी तर अप्रतीमच!

यानंतर उल्लेखनीय असे *कन्हैया* (राजकपूर) , *सूरत और सीरत*(धर्मेंद्र) आणि *मंजिल*(देव आनंद) हे चित्रपट आले.*छबिली* हा नूतनची बहीण तनुजा हिचा नायिका म्हणून पहिला  चित्रपट! दिग्दर्शिका म्हणून नांव जरी शोभनाजींचे असले तरी चित्रपट नूतननेच दिग्दर्शित केलेला. त्यात नूतनची भूमिका पण होती आणि तीने स्वतः गाणी पण गायली. संगीत स्नेहल भाटकरजींचे...

 १९६२ मधेच पुन्हा एक अत्युत्तम चित्रपट आला, बिमलदा यांचाच"बंदिनी" एक फसवली गेलेली मुलगी..प्रियकराने (अशोक कुमार) तिला सोडून दुसर्र्या बाईशी लग्न केल्यामुळे द्वेषाने धुमसत असलेली ती.. त्याच्या बायकोला विष पाजते आणि तिला तुरुंगात पाठवले जाते...हळू हळू जेलमधल्या समदुःखी बायकांबरोबर ती स्वतःचे दुःख विसरु लागते. जेलचा तरुण डॉक्टरला (धर्मेंद्र) ती आवडू लागते. शिक्षा भोगून बाहेर पडताना अचानक  जुन्या प्रियकराची गांठ पडते. ती द्विधा मनःस्थितीत..केलेली फसवणूक विसरुन आजारी प्रियकराच्या बरोबर जावे कि नव्याने आयुष्यात आलेल्या पुरुषाबरोबर सुखाने पुढचे जीवन व्यतीत करावे...  बॅकग्राउंडला सचिनदांचे स्वतःच्या आवाजातल गीत ..*मेरे साजन है उस पार*...असं सांगतात कि सगळ्यांना वाटत होतं चित्रपटाचा सुखांत व्हावा. ती धर्मेंद्र बरोबर जाते असा शेवट करावा. पण बिमलदा आपल्या मताशी ठाम होते...बोटीचा शेवटचा भोंगा वाजतो आणि नूतन अशोक कुमारच्या दिशेने जाते. काय अप्रतिम कलाकृती! ह्या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.यातली गाणी पण केवळ लाजवाब!

 नवकेतनचा *तेरे घरके सामने*..पुन्हा देव आनंद! खूप सुंदर भट्टी जमलेला चित्रपट! संगीत सचिनदांच! गाणीही श्रवणीय! त्यानंतर सुनीलदत्त बरोबरचा *खानदान* अजून एक हीट चित्रपट.
 नूतन, धर्मेंद्र आणि रहमान यांचा *दिलने फिर याद किया*! संगीतकार..सोनिक ओमी! *लाट साहब*" आणि *दुल्हन एक रातकी* यानंतर दोन जबरदस्त चित्रपट आले  पुर्नजन्मावर आधारीत *मिलन* आणि गुजराथी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला *सरस्वती चंद्र*...दोनही सुपरहीट! नंतर संजीव कुमार बरोबरचा *देवी* "मनोज कुमार बरोबरचा "*यादगार*" आणि ७० च्या दशकाच्या सुरुवातीला आलेला* सौदागर*"...वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीबरोबर स्वार्थी हेतूने केलेले लग्न..तिची फसवणूक....होणारा संताप... नूतनने फार परीणामकारक रितीने दाखवलाय! त्यानंतर *मैं तुलसी तेरे आंगनकी* आणि *साजन बिना सुहागन* हे लक्षात येण्याजोगे चित्रपट! मै तुलसी...ला  फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ..१९५२ मधे दिलीपकुमार बरोबर तिचा "शिकवा" नावाचा चित्रपट बनत होता पण काही आर्थिक कारणांमुळे प्रदर्शित झाला नाही. ती तिची इच्छा सुभाष घईंच्या "कर्मा" मधे पूर्ण झाली. यानंतर नाव घेण्याजोगा महेश भट्टंचा *नाम* आणि सुभाष घईंचाच *मेरी जंग*....त्यात नूतनला उत्कृष्ट सह नायिकेचे फिल्मफेअर मिळाले. तिला तिच्या अभिनया कस लागणारे बरेच चित्रपट मिळाले. एकूण ६ फिल्मफेअर तसेच  *पद्मश्री* पुरस्कार मिळाले.

रजनीश बहल या नेव्ही आॅफीसरशी तिने लग्न केले आणि तिचा मुलगा मोहनीश हा ही अभिनेता आहे. तिने बहुतेक सर्व नायकांबरोबर चित्रपट केले. एरवी सगळं काही ठीक असणार्र्या नूतनला एक सल होती. ज्या आईमुळे ती या क्षेत्रात आली, जिने तिला घडविले तिच्याशीच पैशाच्या व्यवहारावरुन वाकडे आले. तब्बल वीस वर्ष त्या एकमेकांशी बोलतही नव्हत्या. नूतन अकाली गेल्याचे त्यांना अतीव दुःख झाले. शेवटची काही वर्ष नूतनने कृष्णाची भजने लिहून त्यांना चालीही लावल्या आहेत. १९८९ मध्ये तिला ब्लडकॅन्सचे निदान झाले. आणि फेब्रुवारी १९९१ मधे तिचे दुखःद निधन झाले. तिला तिच्याच गीतात भावपूर्ण आदरांजली!

*तेरा जाना दिलके अरमानोंका लूट जाना कोई देखे बनते तकदिरोंका मिट जाना

नूतनचे काही गाजलेले चित्रपट आणी गाणी...

*सीमा*
*तू प्यारका सागर है
*बात बातमें रुठोना
*सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी
*कहां जा रहा है तू ऐ जानेवाले

*सुजाता*
*नन्ही कली सोने चली ..
.*काली घटा छाए मोरा जिया तरसाए*
 *जलते है जिसके लिए...
*बचपनके दिन भी क्या दिन थे..
.*तुम जिओ हजारों साल
*सुन मेरे बंधु रे सुन मेरे मितवां

*बंदिनी*
*मोरा गोरा अंग लैले
*अबके बरस भेजो भैया को बाबुल
*ओ जानेवाले हो सके तो
*ओ पंछी प्यारे सांझ सकारे
* जोगी जबसे तू आया मेरे

*पेईंग गेस्ट*
*माना जनाबने पुकारा नहीं
*ओ निगाहे मस्ताना
*चांद  फिर निकला मगर तुम न आए

*दिल्ली का ठग*
*ये राते ये मौसम नदीका किनारा
*सी ए टी कॅट माने बिल्ली

*छबिली*
*ए मेरे हमसफर रोक अपनी नजर
*लहरोंपे लहर उल्फत है जवां

*अनाडी*
*वो चांद खिला वो तारे हसे
*सबकुछ सीखा हमने
*दिलकी नजरसे नजरोंकी दिलसे

*छलिया*
*बाजे पायल छुन छुन होके बेकरार*
*तेरी राहोमें खडे है दिल थामके*
*मेरे टूटे हुए दिलसे कोई तो आज ये पूछे

*कन्हैया*
*मुझे तुमसे कुछ भी न चाहिये
*याद आयी आधी रातको कल रातकी\ तौबा
*नी बलिये रुत है बहारकी

*मिलन*
*हम तुम युगयुगके ये गीत मिलनके
*बोल गोरी बोल तेरा कौन पिया
*राम करे ऐसा हो जाए

*सरस्वती चंद्र*
*छोड दे सारी दुनिया! किसीके लिए
*फूल तुम्हे भेजा है खतमें
*चंदनसा बदन चंचल चितवन

*दिल ही तो है*
*निगाहे मिलानेको जी चाहता है
*लागा चुनरीमें दाग
*तुम अगर मुझको न चाहो तो

*दिलने फिर याद किया*
*आजारे प्यार पुकारे नैना तो रो रो हारे
*दिलने फिर याद किया बर्कसी लहर आयी है
*कलियोंने घूंघट खोले हर फूलपे भंवरा
डोले

©कृपा देशपांडे..

Comments